तुम्ही गांधीच राहा, ‘ती’ पात्रता तुमच्यात नाहीच!

अग्रलेख

 

मी सावरकर नाही,  मी गांधी आहे, असे   राहुल गांधी पुन्हा पुन्हा सांगत आहेत, ते योग्यच आहे. कारण, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंगी जे गुण होते, त्यातला एकही सद्गुण राहुल गांधी यांच्या अंगी नाही. सावरकर थोर देशभक्त होते, लढवय्ये होते, देशासाठी समर्पित होते, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठी प्रचंड त्याग केला. इंग्रजांच्या राजवटीत काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली. राहुल गांधी यांनी काय भोगले? हिंमत असेल तर राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस अंदमानच्या काळकोठडीत राहून दाखवावे, आम्ही त्यांचा सत्कार करू. सावरकरांसारख्या राष्ट्रभक्तांनी केलेल्या त्यागामुुळे मिळालेले स्वातंत्र्य तेवढे   राहुल गांधी यांनी भोगले आहे, भोगत आहेत. त्यामुळे राहुल यांनी स्वातंत्र्यवीरांशी स्वत:ची तुलना करू नये आणि स्वत:ला सावरकर तर अजिबातच समजू नये.  राहुल गांधी कोण आहेत, काय आहेत, त्यांची बौद्धिक क्षमता आणि पातळी किती आहे, हेही संपूर्ण देशाला माहिती आहे. दुर्दैवाने मी संसदेचा सदस्य आहे, असे जे जाहीरपणे बोलतात, ते किती बालिश आहेत, हेही देशवासीयांना माहिती आहे.

 

 

स्वातंत्र्यवीर सावरकर  हे धाडसी होते, देशप्रेमी होते, थोर समाजसुधारक होते, विचारवंत होते. राहुल गांधी कोण आहेत? फक्त गांधी   आडनाव मिळाल्याने माणूस मोठा होत नसतो. त्यासाठी कर्तृत्वाची आवश्यकता असते. राहुल गांधींचे कर्तृत्व काय? मोदी, संघ, भाजपा, सावरकर यांना शिव्या देण्यापलीकडे त्यांनी काय केले? काहीच नाही. जर ते कर्तृत्ववान असते तर त्यांनी अध्यादेश फाडण्याचा मूर्खपणा केलाच नसता. डोके ठिकाणावर ठेवून ते बोलले-वागले असते तर त्यांच्या काँग्रेस पक्षाची आज एवढी दयनीय अवस्था झाली असती? नाही. पण, आज काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे आणि नजीकच्या भविष्यात तो संपलेला असेल, यात शंका नाही. दररोज उठून संघ, भाजपा आणि मोदींना शिव्या दिल्या म्हणजे आपली लोकप्रियता वाढेल आणि काँग्रेस पक्षाला ऊर्जितावस्था येईल, या भ्रमात त्यांना राहू देणे, यातच देशाचे हित आहे, हे भारतीय जनता पार्टीनेही लक्षात घेतले पाहिजे. ज्या नेत्यामुळे आपला पक्ष संपत चालला आहे, त्या नेत्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार्‍या जी-23 नेत्यांचे आम्हाला खरोखरीच कौतुक वाटते. पण, जे अजूनही लाचार आहेत, गांधी आहेत म्हणून लाचार बनून, स्वत:चे मन मारून गुणहीन नेतृत्वाचे तळवे चाटत आहेत, त्यांना काय म्हणायचे? जोपर्यंत  काँग्रेसमध्ये लाचारांची फौज आहे, तोपर्यंत काँग्रेसला कोणतेही भवितव्य नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.

 

 

राहुल गांधी, त्यांच्या मातोश्री  सोनिया गांधी, काँग्रेसमधील चौकडी आणि काँग्रेसचे देशभरातील अनेक नेते सावरकरांबद्दल अवमानजनक वक्तव्ये करत असतात. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर, ज्या सावरकरांना आपण शिव्या देतो, त्या सावरकरांच्या नखावरील धुळीची तरी आपण बरोबरी करतो का, याचे चिंतन काँग्रेसी मंडळींनी केले पाहिजे. पण, तेवढे औदार्य नसलेले काँग्रेस नेते आपल्या हीन प्रवृत्तीचे दर्शन देशाला घडवत राहतील आणि आपली लायकी दाखवत राहतील व एक दिवस काँग्रेस विसर्जित करण्याची महात्मा गांधी यांची सूचना प्रत्यक्षात आणतील, यात शंका नाही. काँग‘ेस अजूनही पराभूत मानसिकतेतून बाहेर आलेली नाही आणि पराभवातून धडा घ्यायलाही तयार नाही.   गांधींचे नाव घेऊन संघ-भाजपा-मोदींना शिव्या घालून आपण फार मोेठे राष्ट्रकार्य करतो आहोत, या भ्रमातून काँग्रेसींना बाहेर काढण्याचे पाप भाजपानेही आता करू नये. मोदींना सत्तेतून हटविण्याचे प्रयत्न करताना आम्ही सत्तेत आल्यास देशासाठी काय करू, हे जर काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेला सांगितले तर एकवेळ समजून घेता आले असते. पण, संघ-भाजपा-मोदींवर टीका करण्यापलीकडे कसलाही अजेंडा काँग्रेसकडे नाही आणि त्यामुळे त्यांच्या सध्याच्या तमाशाचा त्यांना निवडणुकीत काही फायदा होईल, याची अजिबात शक्यता नाही.

 

 

मोदींनी या देशातील गरिबांची फसवणूक केल्याचा आरोप करणार्‍या काँग्रेसने थोडे इतिहासात डोकावून पाहणे गरजेचे आहे. इंदिरा गांधी  पंतप्रधान असताना 1975 साली त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. पण, प्रत्यक्षात काँग‘ेसच्या सत्ताकाळात गरिबांच्या मतांचे फक्त राजकारण केले गेले आणि गरिबी हटण्याऐवजी गरीबच हटवले गेलेत. प्रत्येकवेळी गरिबीच्या नावाने राजकारण करण्यात काँग्रेस यशस्वी होत गेली आणि याच काँग्रेसने देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. आज परिस्थिती बदलली आहे. जनता हुशार झाली आहे, स्वत:च्या हक्कांप्रति जागरूक झाली आहे. त्यामुळेच 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी संधिसाधू काँग्रेसला घरी बसवून मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपाच्या हाती सत्ता सोपविली आहे. तेव्हापासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे सातत्याने फक्त मोदी आणि भाजपावरच टीका करीत आहेत. ते दिशाहीन राजकारण करीत असल्याने काँग्रेसचे राजकीय भवितव्यही अंधकारमय झाले आहे. मध्यंतरी राहुुल गांधी  लंडनला गेले होते. भारतात नसलेल्या परिस्थितीचे वर्णन करत त्यांनी आपल्याच देशाची बदनामी केली. त्यांचे तळवे चाटणार्‍या समर्थकांनी राहुल यांच्या भूमिकेला पाठिंबाही दिला. मागे अमेरिकेत गेले असता घराणेशाहीबाबत ते बोलले. कोणी कुठे काय बोलावे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. असे असले तरी बोलताना तारतम्य बाळगण्याचे भान ठेवणे तेवढेच आवश्यक आहे.

 

 

घराणेशाही तर भारतात चालतच राहणार, ती सगळीकडेच आहे, केवळ काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे इतरांनी आमच्यावर टीका करू नये, अशी अपेक्षा   राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. ती अजिबात योग्य नाही. देशात घराणेशाहीची सुरुवात काँग्रेसनेच केली. पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी, इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी, त्यांच्यानंतर आता सोनिया आणि  राहुल गांधी काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारच. शिवाय, काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांची मुलेही सक्रिय राजकारात उतरली आहेत. अनेकांची मुले आमदार आणि खासदार झाली आहेत. यात काही गैर नाही आणि हे असे चालतच राहणार, असे जर राहुल गांधी म्हणत असतील तर त्यांचे राजकीय भवितव्य किती उज्ज्वल आहे, हे येणारा काळच सांगेल. ज्या काँग्रेसने घराणेशाही जन्माला घातली, त्याच काँग्रेसने घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला असता तर अन्य राजकीय पक्षांनाही त्याबाबत विचार करावा लागला असता.

 

काँग्रेसने जन्माला घातलेली घराणेशाही इतर राजकीय पक्षांमध्येही आली आहे, हे नाकारता येत नाही. पण, ज्यांनी घराणेशाहीची सुरुवात केली, ते तिचा बचाव करीत असतील आणि त्यासाठी नेहरूंनी देशासाठी काय काय केले, याचा पाढा वाचणार असतील तर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदार पुन्हा त्यांना जागा दाखवतील यात शंका नाही. पंडित नेहरूंच्या राजवटीत देशात उच्च शिक्षण देणार्‍या अनेक संस्था स्थापन झाल्या, पंडित नेहरू यांनीच देशाला वैज्ञानिक विचार दिला आणि आयआयटीसारख्या संस्थांनाही जन्म दिला असा युक्तिवाद काँग्रेसकडून कायम केला जात असतो. पण, या देशात असलेली गरिबी वाढविण्याला, भ्रष्टाचाराची कीड फैलावण्याला, घराणेशाहीचा विस्तार करण्यालाही आम्हीच जबाबदार आहोत, हे काँग्रेस कधीच मान्य करीत नाही. काँग्रेसचे नेते स्वत:च्या सोईने खरेखोटे बोलत असतात, हे देशाने अनुभवले आहे. ज्या भारतीय जनता पार्टीवर काँग्रेसकडून कायम सांप्रदायिकतेचा आरोप केला जातो, त्याच काँग्रेसने देशातील मुस्लिमांचे लांगूलचालन करीत बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजावर अन्याय केला आहे, याचा विसर पडता कामा नये.

 

झालेल्या चुकांमधून धडा शिकायला काँग्रेस तयार नाही. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी जोरदार आपटी दिल्यानंतरही काँग्रेस स्वत:मध्ये सुधारणा करायला तयार नाही. ज्या मुस्लिम समुदायाने   काँग्रेसला कायम साथ दिली, त्या समुदायाच्या अधोगतीला काँग्रेसच जबाबदार आहे, हे मुस्लिमांच्याही आता लक्षात आले आहे आणि त्यामुळेच ते काँग्रेसेतर भाजपाविरोधी पक्षांकडे वळले आहेत, हेही काँग्रेस लक्षात घ्यायला तयार नाही. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी बहुुसंख्य हिंदू समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा मोठा फटकाही काँग्रेसला बसला आहे. भाजपाने हिंदुहिताचा मुद्दा हाताळला तर लागलीच भाजपाला सांप्रदायिक ठरवायचे आणि मुस्लिमांच्या मनात भाजपाची प्रतिमा व्हिलनसारखी निर्माण करायची, असला उद्योग केल्यानेच काँग‘ेसने मार खाल्ला आहे, याचाही विसर काँग्रेसने पडू देता कामा नये.