जळगाव : शिवाजी नगरातील टी पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्यात एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. या प्रकाराला रहिवाशी कंटाळले असून, ‘प्रशासक मॅडम, तुम्हीच सांगा, आम्ही आता काय करावे?’ असा उद्विग्न सवाल रहिवाशांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना केला.
पुलाच्या बांधकामासाठी आम्हाला दोन्ही बाजुंनी 20 मीटर जागा द्यावी व तेथील अतिक्रमण काढून द्यावे, असे पत्र बांधकाम विभागाने महापालिकेला मध्यंतरी दिले होते तर आमच्यासोबत येऊन पाहणी करा, जागेची आखणी करा.आवश्यकता वाटली तर आम्ही लगेच अतिक्रमण काढू, अशी तयारी महापालिकेने दर्शविली आहे, पण तरीदेखील हा विषय मार्गी लागत नाही. गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून शिवाजी नगरमधील लोकप्रतिनिधी, विविध संस्था, विविध पक्ष व समाजसेवक यांच्याद्वारे दोन्ही यंत्रणांकडे पाठपुरावा व स्मरणपत्रे देत आहेत. हे प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे.
शिवाजी नगरातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख विजय संजय राठोड, भूषण कोष्टी, अरुण शिंदे व इतरांनी सोमवारी पुन्हा आयुक्तांची भेट घेऊन स्मरणपत्र दिले. त्यावर आयुक्तांनी हे प्रकरण आमच्या अख्त्यारीतले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग काम करणार आहे. रस्ता सुरक्षेची बैठक तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत आपण स्वत: प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे आणि भविष्यातही आपण सकारात्मक राहू, असे स्पष्ट केले.
नागरिकांचेही वेगवेगळे मतप्रवाह
दरम्यान, शिवाजी नगरात जाण्यासाठी नव्याने पूल झाल्याने आता टी आकाराच्या पुलाची गरज नाही. या ठिकाणी पूल झाला तर लोकांची घरे तोडावी लागतील. शाळा बंद पडेल, लोकांचा व्यवसाय बंद होईल, असा एक मतप्रवाह असून काही जणांनी हा पूल होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘पूल व्हावा व होऊ नये’ अशा दोन्ही आशयाचे अर्ज बांधकाम विभागाकडे आले आहेत, त्यामुळे हे काम रेंगाळत चालले आहे.