ड्रग्जचे धागेदोरे शोधण्यासाठी मातोश्रीवर टाका पहिलं पाऊल ! कुंपणच खातंय शेत हे कळेल

मुंबई : ड्रग्ज आणि अमली पदार्थांचे धागेदोरे शोधण्यासाठी पहिलं पाऊल मातोश्रीवर टाका, असा सल्ला भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितेश राणे म्हणाले की, “पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाला देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री कसे जबाबदार आहेत, याबद्दल संजय राऊत बोलतात. पण राज्यात गेल्या पाच वर्षांपैकी अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी तुमचे मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग त्या अडीच वर्षांत ड्रग्ज प्रकरण थांबवण्यासाठी तुम्ही काय काय केलं? उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलण्याआधी उडता मातोश्रीबद्दल आधी विचार करा.”

“तुमच्या मालकाचा मुलगा ड्रग्ज घेणाऱ्या लोकांसोबत कुठे कुठे असतो आणि त्याचे परिणाम सुषांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात कसे येतात, हे कधीतरी त्यांना विचारा. मगच उडता पुणा आणि नाशिकबद्दल बोला. ड्रग्ज आणि अमली पदार्थांचे धागेदोरे शोधायचे असल्यास पहिलं पाऊल मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून टाका. तिथून खूप मोठे धागेदोरे सापडतील. कुंपनच शेत खातंय हे तुम्हाला तिथून कळेल,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.