---Advertisement---
जळगाव : मोहननगर येथील २९ वर्षीय तरुण व्यावसायिकाने नैराश्यातून मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. दिवसभर शोधकार्य सुरू राहिल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. विनय देशमुख (२९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
विनय देशमुख यांचे शहरात झेरॉक्सचे दुकान होते. तर त्याचे वडील अडावद येथील जि.प. शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत. काही दिवसांपासून विनय नैराश्यात होता. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला असेल असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, तो दुकानावर पोहोचला नसल्याचे लक्षात आले.
शोध घेत असताना विनय मेहरूण तलावावर गेल्याची माहिती मिळाली. तलावाच्या परिसरात त्याची दुचाकी आढळली. यामुळे त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दिवसभर शोध मोहीम सुरू होती, मात्र विनयचा शोध लागला नव्हता. अखेर, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला.
त्यानंतर मृतदेह जीएमसीत आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.