जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला बॅटने मारहाण, तर काहीएक कारण नसताना कसल्यातरी शस्त्राने पिता-पुत्रावर वार करत जखमी केले. पान सेंटरच्या बाजूला लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या तिन्ही घटना जळगाव शहरातील विविध भागात घडल्या असून, (Jalgaon Crime News) या प्रकरणी त्या त्या हद्दीतीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला बॅटने मारहाण
जळगाव : प्रेमविवाहाच्या कारणावरून लाकडी बॅट कपाळावर मारून संशयिताने तरुणाला जखमी केले. बुधवारी (२ एप्रिल) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील उस्मानिया पार्क परिसरात घडली. ३४ वर्षीय तरुण वाहनावर चालक आहे. सलमान सलीम खान (उस्मानिया पार्क) याने प्रेम विवाहाच्या कारणावरून चालकाला गाठले. लाकडी बॅट मारून कपाळाला दुखापत केली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल झाला असून हवालदार शशिकांत पाटील तपास करीत आहेत.
पिता-पुत्रांवर शस्त्राने वार
जळगाव : काहीएक कारण नसताना हातातील कसल्यातरी शस्त्राने पिता-पुत्रावर वार करत जखमी केले. या घटनेत सद्दाम शहा हुसेन शहा (वय ४२, रा. टिपू सुलतान चौक, तांबापुरा) तसेच त्यांचा मुलगा इम्तियाज शहा हे जखमी झाले. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास टिपू सुलतान चौक तांबापुरात सद्दाम शहा यांच्या घरासम ोर घडली. तक्रारीनुसार शमिर काकर व साहिल काकर (पूर्ण नाव माहीत नाही. रा. बिस्मिल्ला चौक) यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला. हवालदार रामदास कुंभार हे तपास करीत आहेत.

दुचाकी लंपास
जळगाव : पान सेंटरच्या बाजूला लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ३० मार्च रोजी सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील फुले मार्केटसमोर रोडच्या कडेला घडली. दीपक शिवनलाल इस्त्रानी (वय ५१, रा. गुरुदत्त कॉलनी-श्रीकृष्ण कॉलनी) है हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ बीटी ६९४५) ही फुले मार्केटसमोर अक्षरा पानटपरीच्या बाजूला त्यांनी लावली होती. दुचाकीचा त्यांनी सर्वत्र शोध घेतला. तपास लागला नाही. तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार किशोर निकुंभ हे तपास करीत आहेत.