---Advertisement---
जळगाव : शहरासह जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दोन दिवसाआड खुनाच्या घटना समोर येत असून, या गुन्हेगारी वाढीमुळे नागरिक चिंतित आहेत. अशात पुन्हा एका ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला असून, हा अपघात नसून खून असल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. हर्षल प्रदीप भावसार (वय ३१, रा.दिनकर नगर, जुना आसोदा रोड, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसात नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सीसीटीव्ही तपासात रविवारी (ता. १६) रात्री १० ते १०.३० दरम्यान ओंकार हॉटेल, खेडी रोड येथे हर्षलचे भुषण संजय महाजन व लोकेश मुकुंदा महाजन यांच्यासोबत भांडण झाल्याचे दिसून आले. या तिघांनी हर्षलला ओंकार हॉटेल व काशिबाई शाळेच्या मागील रस्त्यावर मारहाण केली. त्यानंतर मोटारसायकलवर बसवून घेऊन गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
नातेवाईकांचा आरोप आहे की, तिघांनी मिळून हर्षलचा खून करण्याच्या हेतूने त्याला भादली येथील तिसऱ्या रेल्वे लाईनवर टाकून दिले, ज्यामुळे त्याचा रेल्वे फटक्यात मृत्यू झाला. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी भुषण महाजन, लोकेश महाजन व परेश महाजन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
एकाला अटक
या प्रकरणी पोलिसांनी भुषण यास अटक केली असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









