जळगाव : मेहंदीच्या दिवशीच एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ मे रोजी पहाटे ३:४० वाजता अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात घडली. दीपाली सुभाष पाटील (वय २२) मृत तरुणीचे नाव आहे. मेहंदीच्या कार्यक्रमात दीपालीने स्वतः नृत्यही केले होते. मात्र, घरात आनंदाचे वातावरण असतानाच पहाटे अचानक ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात दीपाली आपल्या कटुंबियांसह वास्तव्याला होती. दीपालीचा विवाह गडखांब येथील एका तरुणाशी १७ मे रोजी ठरलेला होता. त्यानिमित्त १५ तारखेला तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
१४ तारखेला रात्री तिच्या घरी संगीताचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दीपालीने स्वतः नृत्यही केले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच पहाटे अचानक ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दीपालीची आई पहाटे उठल्यावर तिला मुलगी घरात कुठेही दिसून आली नाही. शेजारी असलेल्या खोलीत त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, दीपालीने गळफास लावल्याचे दिसले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवघ्या दोन दिवसांवर लग्न असताना दीपाली हिने अचानक टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्नही उपस्थित होते आहे. दरम्यान, आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दागिने लांबविले
चाळीसगाव : येथे ७० वर्षीय कलाबाई पाटील यांना पोलीस असल्याचे भासवून चौघांनी अडीच लाखांचे दागिने लांबविले. ही घटना १२ रोजी घडली. खरजई रस्त्यावर दोन दुचाकींवर आलेल्या चार जणांनी “परिसरात चोऱ्या आहेत, वाढल्या दागिने तपासणीसाठी द्या” अशी बतावणी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.