युवापिढी आणि स्वामी विवेकानंद!

तरुण भारत लाईव्ह । दिलीप देशपांडे । स्वामी विवेकानंदांचा युवाशक्तीवर खूप विश्वास होता आणि तो त्यांनी आपल्या अनेक भाषणांतून व्यक्तही केला होता. युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा जागृत करून तिचा उपयोग केला तर युवक निश्चितच त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात, हा विश्वास स्वामी विवेकानंदांना होता. स्वामीजींनी युवकांविषयी जो विश्वास व्यक्त केला होता तो सार्थ ठरावा त्यादृष्टीनेच त्यांच्या विचारांचा भारतीय तरुणांमध्ये प्रचार व प्रसार व्हावा आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेला जागृत करून एक चांगला व सामर्थ्यशाली देश बनावा, ही त्या मागची भावना. म्हणूनच स्वामी विवेकानंदांची जयंती, १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. आजही आपला भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात युवकांची संख्या जवळपास ६५ टक्क्यांपर्यंत आहे आणि म्हणूनच युवापिढीच्या क्षमता आणि ताकदीवर आपला देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे.
देशाच्या विकासात युवकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. मग तो देशकार्यात असेल, सामाजिक सुधारणात असेल, शैक्षणिक विषयात असेल, औद्योगिक क्षेत्रात असेल पण तो आवश्यक आहे आणि त्यादृष्टीने खूप अधिक प्रयत्न आवश्यक आहेत. नुसताच युवकांचा मोठा देश म्हणून बिरुदावली मिरवून चालणार नाही, तर त्या युवाशक्तीला सर्व क्षेत्रात एक चांगले विधायक वळण देणे तितकेच आवश्यक आहे. आज देशाच्या सीमेवर लढणारा हा युवकच आहे. आज आपल्या आजूबाजूची परिस्थिती म्हणजे आपल्या देशातीलच युवकांची परिस्थिती बघितली तर ती खूप अशी समाधानकारक नाही असे म्हणावे लागेल. कारण युवक हा अनेक बाबींशी संबंधित असतो. मग युवक विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहे, राजकीय संघटनेशी संबंधित आहे, राजकारणाशी संबंधित आहे, सामाजिक कार्याशी संबंधित आहेत.  परंतु, ज्या प्रमाणात आणि ज्या योग्य दिशेने युवकांचे कार्य पुढे जायला हवे ते मात्र हवे तसे नाही, म्हणजेच थोडक्यात आजचा युवक हा एका भरकटलेल्या अवस्थेत सापडला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
प्रत्येक क्षेत्रात युवकांच्या संघटना आहेत. शिक्षण क्षेत्रात आहेत, सामाजिक क्षेत्रात आहेत, राजकीय क्षेत्रात आहेत पण या सर्वांचे ध्येय काय आहेत?  याचाच विसर त्यांना पडलेला आहे. सर्व संघटनांची सरमिसळ झाली आहे आणि युवक वर्गात खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, एकच आहे की या युवाशक्तीचा वापर केला जातो. परंतु, त्यांच्या प्रश्नांकडे मात्र लक्ष दिले जात नाही आणि त्यामुळे ते भरकटले आहेत. त्या त्या वेळेपुरता त्यांच्यामध्ये उत्साह असतो. मात्र, त्यानंतर एक वेगळा मार्ग त्यांच्याकडून स्वीकारला जातो. आज विद्यार्थी संघटना पाहिल्या तर त्याला पक्षीय स्वरूप आले आहे. प्रत्येक पक्षाच्या विचाराने काम करणारी संघटना निर्माण झाली आहे. सहाजिकच त्यांच्यावर त्यांच्या पक्षाच्या विचारांचा प्रभाव पडतो आणि मग राजकीय हेवेदावे सुरू होतात आणि मुळातच आपण विद्यार्थ्यांसाठी आहोत आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न, अडचणी आपल्याला सोडवायचे आहेत, याचा विसर पडतो.
एकीकडे नवीन तंत्रज्ञान आले आहे. जग जवळ आले आहे. पण माणूस हरवलेला आहे. युवक इंटरनेट, मोबाईल, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेला आहे. हवा तेवढा उपयोग न करता, नको तेवढा दुरुपयोग केला जातो. म्हणूनच या युवाशक्तीला विधायक वळण लावणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारातून युवा पिढीला चांगला विचार मिळू शकतो आणि त्यादृष्टीनेच युवापिढीनेही विवेकानंदांच्या विचारांचा अंगीकार करायला हवा. कृषी क्षेत्रातही आपण बघतो अगदी तरुण मुले शेतीच्या व्यवसायात तोटा येतो म्हणून आत्महत्या करतात. अर्थातच त्यांची वैचारिक क्षमता संपल्यामुळेच हे सगळे होत आहे. विचारांची क्षीणता घालवणे हा त्यावर मोठा उपाय आहे आणि ती सकारात्मक विचारांतूनच घालवता येईल. त्या दृष्टीने स्वामी विवेकानंदांचे पुढील विचार प्रेरणादायी आहेत.
 सर्वोच्च आदर्श निवडा आणि त्याप्रमाणे आयुष्य जगा. लाटांकडे नाही तर महासागराकडे पहा.
 दिवसातून एकदा तरी स्वत:शी बोला नाहीतर तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्तीला भेटायला मुकाल.
काम, काम आणि काम हेच तुमच्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे.
माझ्या भविष्यातील आशा तरुणांच्या चारित्र्यावर, बुद्धिमत्तेवर, त्यागावर आणि इतरांची सेवा करण्यासाठी सर्वांच्या आज्ञाधारकतेवर अवलंबून आहेत, जे स्वत:साठी व देशासाठी चांगले कार्य करतात.
 आपल्या देशाला नायकांची गरज आहे. नायक बना. काम करणे तुमचे कर्तव्य आहे आणि मग सर्वजण तुमचे अनुकरण करतील.
 उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका. जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होणार नाही.
स्वत:ला कमकुवत समजणे, हे सर्वात मोठे पाप आहे.
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
एकावेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.
 सत्यासाठी सर्वकाही सोडून द्यावे, पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
स्वत:चा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचे असेल ते बोलू द्या. एक दिवस हेच लोक तुमचे गुणगान करतील.
आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचे चिंतन सतत केले पाहिजे.
घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
स्वत:ला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
विचार करा, काळजी करू नका. नवीन कल्पनांना जन्म द्या.
 कोणाची qनदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा आणि जर शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
 जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती भित्री असतात. जे स्वत:चे भविष्य स्वत: घडवतात तेच खरे कणखर असतात.
बल हेच जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.
स्वामी विवेकानंदांचे विचार, तत्त्वज्ञान आणि शिकवण हे भारताची महान सांस्कृतिक आणि पारंपरिक संपत्ती आहे.
विद्यार्थ्यांना व तरुणांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणात स्वामी विवेकानंदांचे विचार पोहोचणे आवश्यक आहे. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाणीव करून देऊन प्रेरणा, चैतन्य आणि उत्साह व यशाकडे वाटचाल करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्येकाने जरूर वाचायला हवे आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा.  स्वामी विवेकानंद म्हणतात- माझ्या तरुण मित्रांनो शक्तिशाली व्हा. ठाम निश्चयाचे आणि तेजस्वी असे १०० युवक जग हादरून टाकू शकतात, असा मला विश्वास आहे. तेव्हा स्वामी विवेकनंदांना अपेक्षित असलेला संस्कारक्षम, कणखर तसेच राष्ट्र व समाजाप्रती समर्पित युवक घडविण्यासाठी तन-मन-धन-पूर्वक कार्य करूया.