यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात चुंचाळे रस्त्यावर एका २५ वर्षीय तरुणाला दारूची बाटली आणून देण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनगाव बुद्रुक (ता. यावल) येथील चुंचाळे रोडवर पंकज सुरेश पाटील (वय २५) हा तरुण उभा असताना गावातील गणेश मोहन चौधरी हा तेथे आला. त्याने पंकजला दारूची बाटली आणून देण्यास सांगितले. मात्र, पंकजने हे काम करण्यास नकार दिला. या नकाराचा राग येऊन गणेश चौधरी याने पंकजला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
यामध्ये त्याच्या दोन्ही पायांना बल्लीने मारून गंभीर जखमी केले, तसेच डोक्यावर वार केला. त्यामुळे पंकजला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर पंकज पाटीलने यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गणेश मोहन चौधरी याच्या विरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.
गांजाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त
चोपडा तालुक्यातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना चोपडा शहर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 1 लाख 45 हजार रुपये किमतीचा 14 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
चोपडा शहरातील नागलवाडी रोडवरील वराड फाट्याजवळ गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यानुसार चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींचे नावं रोहित संजय शेळके (२५) आणि तुळशीराम कचरू आव्हाने (२०), दोघे परभणी जिल्ह्यातील परळीरोड, भीम नगर येथील रहिवासी आहेत.
आरोपींवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांचे नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.