जळगाव : विविध कारणांमुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय उचलण्याची धक्कादायक मालिका जळगाव जिल्ह्यात सुरुच आहे. आता या मालिकेत सुप्रीम कॉलनीतील तरुणाची भर पडली आहे. रविवार , २२ रोजी पत्नी माहेरी तर आई गुजरात येथे गेली असता त्याने छताला गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कैलास जिंदल राठोड (वय ३४, सुप्रीम कॉलोनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. पत्नी, २ मुले, १ मुलगी यांच्यासह तो सुप्रीम कॉलनीत राहत होता. मजुरी काम करुन कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होता. रविवार,२२ रोजी कैलास याची पत्नी माहेरी तर आई गुजरात येथे गेली आहे. घरी कोणी नव्हते. दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास कैलासने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही बाब शेजाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी जवळच राहणारा कैलासचा पुतण्या शुभम राठोड याला सांगितले. त्याने तातडीने येऊन पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून कैलास याला मयत घोषित केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास राठोड याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.