जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे एका ३१ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन करत राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली होती. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत होते. उपचारा दरम्यान त्याची गुरुवारी प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.साजन गायकवाड असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
साजन गायकवाड (३१ , आसोदा ता.जळगाव) हा तरुण राहत होता. तो खासगी नोकरी करुन उदरनिर्वाह करत होता. बुधवार २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साजन गायकवाड हा घरी असतांना त्याने राहत्या घरात विषारी औषध सेवन केले.
साजन यांच्या कुटुंबियांना हीबाब लक्षात येताच त्याला तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवार ५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. तरुणाने विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण हे करीत आहे.