भुसावळ : शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथे 23 वर्षीय तरुणावर दोन ते तीन संशयीतांनी अज्ञात कारणावरून चाकूहल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथे हलवण्यात आले. या प्रकाराची माहिती अकलूद गावात कळताच संतप्त जमावाने संशयित आरोपीच्या घरासह टपरीला आग लावल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. फैजपूरसह भुसावळ पोलिसांना माहिती कळताच त्यांनी धाव घेत गावात शांतता प्रस्थापीत केली. शुभम सपकाळे (23, अकलूद, ता.यावल) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
चाकू हल्ल्याने उडाली खळबळ
अकलूद गावातील शुभम सपकाळे या तरुणावर कुठल्यातरी कारणावरून गावातील दोन ते तीन संशयीतांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शुभमच्या पाठीवर, छातीवर व पोटावर गंभीर ईजा झाल्याने त्यास खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. अकलूद गावात चाकूहल्ल्याची बातमी कळताच संतप्त जमावाने संशयित आरोपीच्या घरवजा टपरीला आग लावून दिली. या घटनेनंतर संशयित आरोपींनी गावातून पलायन केले आहे. भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, फैजपूर उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्यासह पोलिस अधिकार्यांनी गावात धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. भुसावळातील अग्निशमन दलाने घराला लागलेली आग विझवली. दरम्यान, रात्री उशिरा आरसीपीचा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचे आवाहन ग्रामस्थांना पोलिसांनी केले आहे.