जळगाव : शहरातील सरस्वती नगरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली. ध्रुव ललित बऱ्हाटे (१७) असे मयत तरुणाचे नाव आहे.
शहरातील सरस्वती नगरात ध्रुव बऱ्हाटे हा तरूण आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. त्याचे वडील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून तर आई भंगाळे गोल्ड येथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. ध्रुव हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेमध्ये मु.जे. महाविद्यालय येथे शिक्षण घेत होता. गुरुवार, २७ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ध्रुवचे आई-वडील हे कामाला निघून गेले. ध्रुव हा घरी एकटाच होता. त्याने घरात स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याचा लहान भाऊ शाळेतून घरी आला, त्यावेळेला भाऊ दरवाजा उघडत नाही म्हणून त्याने शेजारील नागरिकांना सांगितले. त्यावेळेला परिसरात राहणारे त्याचे नातेवाईक यांनी धाव घेतली. त्यांनी खिडकीतून पाहिले असता ध्रुव हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्यानंतर ध्रुव याला दरवाजा तोडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.