Yuvraj Jadhav : युवराज जाधवांनी खोडले संजय सावंतांचे आरोप, वाचा काय म्हणाले आहेत ?

जळगाव : जळगाव मतदारसंघात भाजपने महाविकास आघाडीचे मते खाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार युवराज जाधव (संभाआप्पा) यांना उभे केले, असा आरोप शिवसेना (उबाठा गट) जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत यांनी २९ रोजी केला होता. त्यावर युवराज जाधव यांनी बुधवार, १ रोजी आपली भूमिका स्पष्ट करत त्यांचे आरोप खोडून काढले आहेत.

जळगाव शहरातील पत्रकार भवन येथे बुधवार, १ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार युवराज जाधव यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिवसेना (उबाठा गट) जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, भोसले हे आमचे सीए आहेत. ते सीए असल्याने त्यांच्याकडे सर्व राजकीय पक्षांचे फॉर्म भरतात. त्या ठिकाणी गोरे म्हणून त्यांचा कर्मचारी आहे, त्यांच्याहस्ते स्टॅम्प आणला. याची आम्हाला कल्पना नव्हती. ही बाब आम्हला प्रसार माध्यमांद्वारे कळली. अधिक चौकशी केली असता ते सीए भोसले यांचे कर्मचारी होते. यात आम्हाला काही गैर वाटत नाही.

दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत असलेल्या फोटोबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, राजकीय जीवनामध्ये विविध सामाजिक कार्यामध्ये विविध पक्षांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत भेट होत राहते. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत असलेले फोटो व व्हिडिओ दाखवत याबाबत प्रश्न उपस्थित केला.

तिसरी गोष्ट, माझे सूचक हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप संजय सावंत यांनी केला आहे. हे जर खरे निघाले तर मी माझ्या उमेदवारीचा राजीनामा देईल, असे आव्हान दिले.

माझ्यावर लावलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. भाजप ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची बी टीम असून, वंचित बहुजन आघाडीचे विरोधक आहेत.  वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी दिल्याने दोन्ही पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहेत. त्यांना काय करावे, हे कळत नसल्याने ते आमच्यावर खोटे आरोप करत आहेत.