पुणे : येथे झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे. ही माहिती मिळताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एरंडवणे आणि मुंढवा येथील तपासणीदरम्यान ६ रुग्णांमध्ये झिका व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, झिका विषाणू संसर्गाची पहिली घटना एरंडवणे येथे समोर आली आहे. येथील ४६ वर्षीय डॉक्टरांचा अहवाल झिका पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या 15 वर्षांच्या मुलीलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तसेच, मुंढवा येथे दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, यामध्ये 47 वर्षीय महिला आणि 22 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
झिका विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क
झिका व्हायरसची लागण झालेल्या सर्व 6 रुग्णांच्या आरोग्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. या रुग्णांमध्ये शरीरावर लाल डाग, ताप, स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार झिका विषाणूचा संसर्ग एडिस डासाच्या चाव्याव्दारे एखाद्या व्यक्तीला होतो. हा विषाणू अधिक धोकादायक आहे कारण तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत राहतो. मात्र, या विषाणूची लागण झालेल्या रुग्णामध्ये सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
झिका व्हायरस कधी आला?
या विषाणूची पहिली केस 1947 मध्ये दिसून आली. युगांडातील माकडांमध्ये या विषाणूचा संसर्ग दिसून आला. तथापि, मानवांमध्ये झिकाची पहिली केस 1952 मध्ये नोंदवली गेली. गेल्या काही वर्षांत झिकाची प्रकरणे वेगवेगळ्या देशांमध्ये दिसून येत आहेत. ऑक्टोबर 2015 ते जानेवारी 2016 दरम्यान, ब्राझीलमध्ये झिका ची हजारो प्रकरणे नोंदवली गेली. या देशातील 4000 मुलांमध्ये झिका व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली.
लक्षणे आणि प्रतिबंध काय आहेत?
डॉक्टरांच्या मते, झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना सतत ताप येत असतो. रुग्ण डोकेदुखी आणि सांधेदुखीची तक्रार करू शकतात. डोळे लाल होतात. शरीरावर लाल रॅशेस देखील दिसतात. हा संसर्ग डासांच्या चाव्याव्दारे पसरत असल्याने घराभोवती पाणी साचू देऊ नका. संरक्षणासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. संक्रमित रुग्ण राहत असलेल्या भागात जाणे टाळा. तसेच जेवणाची विशेष काळजी घ्या.