---Advertisement---
धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना वारंवार गैरहजेरी व शाळेत मद्यपानाच्या अवस्थेत येण्याच्या गंभीर तक्रारींमुळे अखेर निलंबित करण्यात आले. दरम्यान यासंदर्भात प्राप्त तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तत्काळ दखल घेत ही कारवाई केली आहे.
सोमवार ६ ऑक्टोबर रोजी कवठळ येथील जिल्हा परिषद शाळा बंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. शाळेला कुलूप असल्याची माहिती ग्रामस्थांनी गट शिक्षण अधिकारी, धरणगाव यांना दिल्यानंतर याची तात्काळ चौकशी सुरू करीत केंद्र प्रमुखांनी संबंधित शिक्षकास नोटीस बजावली.
दरम्यान संबधीत शिक्षकच शाळेत अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यानंतर गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख चांदसर व केंद्र प्रमुख पाळधी यांनी ९ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष शाळेस भेट देऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान ग्राम स्थ, पालक, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सहशिक्षकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध वारंवार म द्यपान करून शाळेत येणे, वर्ग अध्यापन न करणे व शाळेतून अनधिकृतरीत्या अनुपस्थित राहणे अशा गंभीर तक्रारी नोंदवल्या होत्या.
यासंदर्भात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तातडीने दखल घेत, संबंधित शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार धरणगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना तत्काळ प्रभावाने शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी निलंबन केले आहे.









