गडचिरोली : नक्षली चळवळीतील हिंसाचाराच्या आयुष्याला कंटाळून तसेच शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत एका जहाल नक्षलवाद्याने आज गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. लच्चू करीया ताडो (४५) रा. भटपार ता. भामरागड असे आत्मसमर्पित नक्षलवद्याचे नाव आहे.
लच्चू ताडो हा सन २०१२-१३ पासून गावात राहून जनमिलिशिया म्हणून माओवाद्यांना रेशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून संरक्षित ठेवणे, निरपराध इसमाचा खून करण्याआधी रेकी करून त्याची माहिती देणे, पोलिस पार्टीबद्दल नक्षल्यांना माहिती देणे तसेच नक्षल्यांचे पत्रके पोहोचविण्याचे काम करीत होता. सन २०२३ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत होता. त्याच्यावर एक जाळपोळ व इतर एक अशा दोन गुन्ह्यांत सहभाग होता. २०२२ मध्ये इरपनार गावातील रोड बांधकामावरील १९ वाहनांची जाळपोळ तसेच २०२३ नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यावर स्फोटके पुरून ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. पोलिस दलाच्या आक्रमण माओवादविरोधी अभियान तसेच दलममधील सदस्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यामुळे घरच्यांनी आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त केले.
महाराष्ट्र शासनाने लच्चू ताडो याच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व रज्य शासनाकडून त्याला एकूण ४.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सदर नक्षल्यांचे आत्मसमर्पण घडवून आणण्याची कारवाई नागपूरचे पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलिस उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ बटालियन ३७ चे कमांडंट दाओ इंजिरकान किंडो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.