मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत एकूण 1.17 लाख कोटी रुपयांच्या चार मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. अदानी समूहाच्या एका मोठ्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये इस्रायलच्या टॉवर सेमीकंडक्टर आणि अदानी समूहाने संयुक्तपणे स्थापन केलेल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे उभारल्या जाणाऱ्या या सेमीकंडक्टर प्लांटमध्ये एकूण 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 83,947 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. गुंतवणुकीच्या पहिल्या टप्प्यात 58,763 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 25,184 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.
रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात एकूण 84,947 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 5,000 लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. उपसमितीने दोन इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्मिती प्रकल्प आणि एका वस्त्रोद्योग प्रकल्पालाही मान्यता दिली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘इस्रायलची टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूहाच्या सहकार्याने ॲनालॉग आणि मिश्रित-सिग्नल इंटिग्रेटेड सर्किट्स तयार करण्यासाठी रयगड जिल्ह्यातील पनवेल येथे प्लांट उभारण्यात येणार आहे. सप्टेंबर 2022 मध्ये वेदांत-फॉक्सकॉनने पुण्याजवळील तळेगाव फेज चार (IV) येथील सेमीकंडक्टर प्लांटमधील 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रद्द केल्यानंतर दोन वर्षांनी ही मोठी घोषणा झाली आहे.