अमळनेरात नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांचे जल्लोषात स्वागत

अमळनेर :  जळगाव लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित  खासदार स्मिता वाघ यांचे बुधवार १२ रोजी अमळनेरात आगमन झाले.    खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच स्मिता वाघ या तालुक्यात आल्या आहेत. यावेळी तालुक्यातील नागरिकांकडून खासदार स्मिता वाघ यांचे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात येऊन विजयी रॅली काढण्यात आली.

नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांचे अमळनेरात आगमन होताच त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर त्यांची ओपन जीपमधून विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत अबालवृद्ध सहभागी झाले होते.  विजयी रॅलीचा प्रारंभ पैलाड नाका येथून करण्यात आला. पुढे दगडी दरवाजा-बसस्थानक-महाराणा प्रताप चौक मार्गे धुळे रस्त्यावरील स्व.उदय वाघ यांचे स्मारकाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यारॅलीत अमळनेर मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी खासदार वाघ यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. रॅलीत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी नागरिकांकडून सत्कार स्वीकारत त्यांचे आभार मानले.