जळगाव : तुम्हालापण विमानाने प्रवास करायचा असेल तर ही आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार आहे. यासाठी ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीला भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात डीजीसीएकडून गेल्या काही दिवसापूर्वी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मागील गेल्या तीन वर्षांपासून जळगावची विमानसेवा बंद पडली आहे. विमानसेवा अचानक बंद झाल्यानंतर, जळगाव विमानतळावरून कुठल्याही विमान कंपनीतर्फे विमानसेवा सुरू करण्यात आलेली नव्हती. गेल्या वर्षी उडान योजनेच्या तिसऱ्या राउंडमध्ये नवीनच स्थापन झालेल्या ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने जळगावहून एकाच वेळी पुणे, गोवा व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली.
अखेर सर्व परवानगीनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने ६ मार्च २०२४ रोजी प्रमाणपत्र दिले. यामुळे आता लवकरच जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा हैद्राबादसाठी विमानसेवा सुरु होणार आहे.