जळगाव : कारचा काच वाजवित तुमच्या गाडीचे ऑइल गळत असल्याचा बहाणा करत दोन संशयितांनी दीड लाखाची रोकड़, चेकबूक, कागदपत्रे ठेवलेली पांढरी बॅग घेत पलायन केले. गुरुवार, २९ रोजी रात्री ७.२० वाजेच्या सुमारास शहरात नवीपेठेतील महात्मा गांधी रोडवर हा लुटीचा प्रकार घडला. उपअधीक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. गोपाल काशिनाथ पलोड हे व्यापारी आहेत.
त्यांचे शहरातील नवीपेठेत भारत एजन्सीज नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडे पतंजली कंपनीची एजन्सी असून अन्य मशीनरीचे पार्ट वस्तूची विक्री करतात. दुकानात विक्रीतून जमा होणारी रोकड ते रोज घरी घेऊन येतात. आज ते खाजगी कामानिमित्त दुकानातून घरी लवकर निघाले. त्यामुळे दुकानावर मुलगा कौशल होते. गुरुवारी रात्री त्यांनी दुकानातील दीड लाख रुपये रोख, चेकबूक, पॉलिसी कागदपत्रे पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये ठेवले. त्यानंतर दुकानाच्या शटरला कुलूप लावले.
बॅगमध्ये ठेवल्या. त्यानंतर त्यांचा मुलगा कौशल तसेच चालक राजेंद्र पाटील हे दोघे कार (क्रमांक एमएच १९ ईजी १७७२) गाडीकडे आले. रात्री ७ वाजता दुकानासमोर गाडी काढत असता एक संशयिताने गाडीचा काच वाजविला. तुम्हारी गाडी के आईल गिर रहा है, असे म्हणाला. त्याकडे दोघांनी लक्ष दिले नाही. थोडा वेळानंतर एक तरुण दुचाकी घेऊन मोना आईस्क्रिम दुकानाजवळ रस्त्यावर आला. त्याने कौशल यांना तुम्हारी गाडीके आईल गिर रहा है सांगितले. कार थांबवून कौशलसह चालकाने खात्री केली.
दुकानाच्या चाव्याही घरी गेल्यानंतर प्रकार उघड
चालकासह दोघांनी कारची तपासणी केली असता पुढच्या लॅम्पजवळ आईल लागल्याचे दिसले. गाडीचे बोनट खोलून पाहिले असता गाडीमधून कुठूनही आईल पडत नव्हते. गाडी घेऊन दोघे जण घरी आले असता गाडीच्या मागील सिटवर ठेवलेली पैशांची बॅग आढळली नाही. बॅग चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तत्काळ व्यापाऱ्याने शहर पोलीस ठाणे गाठून प्रकार ठाणे अंमलदारास सांगितला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन इसमांवर गुन्हा दाखल झाला. ज्या ठिकाणी प्रकार घडला तेथे पोलीस अधिकाऱ्यांनी जावून प्रकार जाणून घेतला. गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर ठाकरे हे करीत आहेत.”