जळगाव : लहरी निसर्गाच्या चक्रात शेतातील पिकाचे घटलेले उत्पन्न आणि कर्जफेडीची काळजी यामुळे नैराशातील शेतकऱ्याने शेतातच एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ज्ञानेश्वर तुकाराम बारी- खलसे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवार,९ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घटना उघडकीस आली.
पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह ज्ञानेश्वर बारी शिरसोली येथे वास्तव्यास होते. शेती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे ते आज शेतात गेले. काही वेळ शेतात काम केल्यानंतर ते आंब्याच्या वृक्षाखाली ते छायेत बसले. ते नैराशाच्या विचारात आल्यानंतर त्यांनी त्याच झाडाच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शेत शिवारातील काही शेतकऱ्यांच्या लक्षात आला.
एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. नातेवाईकांसह कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. घटना कळताच शेतकऱ्याचे कुटुंब शोकात बुडाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.