जळगाव : राम हे आपल्या सगळ्यांचे दैवत असून,आपल्या जीवन जगण्याची एक ऊर्जा आहे. कित्येक वर्षांचा संघर्ष आणि केलेल्या परिश्रमाला फळ म्हणून आज कारसेवकांच्या योगदनातून व बलिदानातून प्रभू श्रीराम यांचे मंदिर प्रत्यक्षात साकारलेले आपण पाहत आहोत. त्यामुळे कारसेवकांचा सन्मान हा निश्चित कौतुकास्पद असून कारसेवकाना नतमस्तक होतो. पुढील कित्येक वर्षांपर्यंत ६ डिसेंबर १९९२ व २२ जानेवारी २०२४ हे दिवस एक सुवर्णक्षण म्हणून आपल्या कायम लक्षात राहणार असून रामराज्याचे पाईक होण्यासाठी जीवनात प्रभूरामाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. देशाचे पंतप्रधान यांच्यामुळे आज देश एकसंघ असून एकजूट पहायला मिळाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते बालाजी वहन व्यवस्थापक मंडळामार्फत सन्मान कारसेवकांचा’ या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे समरस्त संघाचे उपाध्यक्ष आर.एन.महाजन होते.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष आर.डी. पाटील, उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे सहसचिव गुलाबराव वाघ, सचिव प्रशांत वाणी, संचालक आर.एन महाजन, कार्याध्यक्ष जिवनसिंग बयास, भानुदास विसावे, पप्पू भावे, विलास महाजन, यांच्यासह शहरवासीय व परिसरातील पदाधिकारी . श्रीरामभक्त व कारसेवक उपस्थित होते.६४ कारसेवकांचा झाला सन्मान.
तालुक्यातील ६४ कारसेवकांचा सन्मान सोहळा येथील बालाजी व्यवस्थापक मंडळामार्फत आयोजित करण्यात आला होता. सत्कार राम मंदिर ते राष्ट्र मंदिराची प्रतिकृती असलेली प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन आर. डी. महाजन यांनी केले. प्रास्ताविकात बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष आर. डी. पाटील यांनी ‘सन्मान कारसेवकांचा’ कार्यक्रमाबाबत माहिती विशद केली. आभार सचिव प्रशांत वाणी यांनी मानले. प्रारंभी कार सेवेत भाग घेणाऱ्या दिवंगत कारसेवकांना नमन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी धृवसिंग राजपूत यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.