तरुण भारत लाईव्ह । १७ जानेवारी २०२३ । भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात एरंडोलनजीक कार व दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एरंडोलनजीक झालेल्या अपघातात मयत ज्ञानेश्वर पाटील याचा येत्या २१ रोजी विवाह होता. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती काहुरखेडा फाट्यावरील पुलाच्या भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात काहूरखेडा येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. सुरज रामदास तांबे (१५, काहूरखेडा) व सुनील विठ्ठल भालेराव (२० वाघारी, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.
एकाचा जागीच मृत्यू
सुरज रामदास तांबे व सुनील विठ्ठल भालेराव हे दोघे सोमवारी पारी तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक (एम.एच.१९ डी. १६०० ) द्वारे भरधाव वेगाने जात असताना दुचाकी काहुरखेडा फाटयावरील पुलाला धडकल्याने सुरजच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुनीलच्या मानेला जबर मार लागल्याने त्यास जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अपघात प्रकरणी
पोलिस साहेबराव शांताराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक किशोर पाटील व हवालदार विजू बाविस्कर करीत आहेत.
दोघे जागीच ठार
दुसऱ्या घटनेत जळगावकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकी यांचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले तर १ युवक गंभीर जखमी आहे. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पिंपळकोठा गावापासुन थोड्या अंतरावर सोमवारी
संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. एम.एच. १५ एच.वाय ०७०० ही मर्सिडीज गाडी जळगावकडून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. या गाडीने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात नितिन जामसिंग पाटील (२१ वर्षे) व घनश्याम भानुदास बडगुजर वय-२० वर्षे हे दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच गतप्राण झाले. याशिवाय ज्ञानेश्वर गणसिंग पाटील (वय २२) हा पादचारी युवक गंभीर जखमी झाला. यावेळी जि.प.चे माजी सदस्य नाना पोपट महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील. हरीभाऊ महाजन, अशोक बडगुजर व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील या युवकास पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. ज्ञानेश्वर हा २१ जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार होता.