जळगावकरांनो खबरदार… दारू पिऊन वाहन चालविल्यास होणार गुन्हा दाखल

जळगाव : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नववर्षाच्या स्वागताची जळगावकरांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. रविवारी दुपारी चारपासून शहरासह जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करीत मद्यपींचा बंदोबस्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. या दिवशी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविल्यास पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

पोलीस दलही मद्यप्राशन करीत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज झाले आहे. त्यांना गृहरक्षक दलाचे जवानही मदत करतील. रविवार, ३१ डिसेंबरपासून दुपारी चार ते सोमवार, १ जानेवारी रोजी पहाटे पाचपर्यंत शहरासह जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी, पेट्रोलिंग तसेच रस्त्यांवर, चौकांमध्ये पोलीस तैनात केले जाणार आहेत. शहर वाहतूक शाखेतर्फेही ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जाईल.पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या नेतृत्वात शहरासह जिल्ह्यात पोलीस दल सज्ज आहे. जळगाव व चाळीसगाव येथील दोन अपर पोलीस अधीक्षकांसह जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, चोपड्याचे डॉ. कुणाल सोनवणे, भुसावळचे कृष्णकांत पिंगळे, अमळनेरचे सुनील नंदलवारकर, मुक्ताईनगरचे राजकुमार शिंदे, पाचोऱ्याचे धनंजय वेरुळे, फैजपूरच्या अन्नपूर्णा सिंह, चाळीसगावचे अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यांचे काही निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी राहणार आहे.

तर होणार १० हजारांचा दंड

ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईसाठी पोलिसांना मद्यप्राशन तपासणी यंत्रेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाईल. शहरात जिल्हापेठ, शहर, एमआयडीसी, शनिपेठ व तालुका पोलीस ठाण्यासह शहर वाहतूक शाखेच्या पथकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल. कोणीही ड्रिंक आणि ड्राइव्ह करत रस्त्यावर येऊ नये. मद्यप्राशन केलेले आढळून आलेल्यांकडून १० हजारांचा दंड आकारण्यात येईल.
– संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक