जळगाव: तुम्हीदेखील निवृत्ती धारक असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी. जिल्ह्यातील कोशागार कार्यालयातून निवृत्तिवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोशागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी दिली.पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफएससी कोडनुसार ही पेन्शन जमा होईल. जर काही पेन्शनधारकांनी या कोशागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करून घेतले असेल तर अशा पेन्शन धारकांचे पेन्शन जमा होण्यास अडचणी निर्माण होतील.
ज्या पेन्शन धारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे. भविष्यात पेन्शन बाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शन धारकांची राहील. जिल्ह्यातील सर्व निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्ती धारकांचे माहे मार्च-२०२४ या महिन्याचे मासिक पेन्शन हे १० एप्रिल २०२४ पर्यंत जमा होईल. याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा कोशागार अधिकारी खैरनार यांनी सांगितले.