जळगावकरांनो! विसर्जनासाठी मेहरुण तलाव परिसरावर राहणार ‘ड्रोनची नजर’

जळगाव :  सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, याठिकाणी कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये, याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव सज्ज झाला असून वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र आणि जीवरक्षक शोध व बचाव पथक तसेच निर्माल्य संकलनासाठी श्री सेवकासह ४० जणांचे पथक मेहरुण तलाव परिसरात सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांच्या नेतृत्वात रविवार, १९ सप्टेंबर रोजी पूर्णवळ हे पथक कार्यरत राहणार आहे. या शोध व बचाव पथकास जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बोट उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात १० पट्टीचे पोहणारे प्रशिक्षित जीवरक्षक तैनात राहणार आहेत. तर अमन गुजर हे ड्रोनद्वारे परिसरावर सतत नजर ठेवून असणार आहेत.