जळगावकरांनो सावधान! उन्हाची झडप लागून एकाच मृत्यू

जळगाव : उन्हाची झडप लागून अत्यवस्थ झालेला तरुण कोसळला. जुने शनिपेठ पोलीस ठाण्याजवळ ही घटना शुक्रवार, १० रोजी दुपारी घडली. पोलिसांनी तत्काळ तरुणाला बेशुध्दावस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. अवघ्या तीन तासात या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. गोविंदा उर्फ राजू भागवत सोनवणे असे मृतकाचे नाव आहे.

शनिपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय शेलार यांनी या अनोळखी व्यक्तीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्यांनी शनिपेठ परिसरात तरुणाची ओळख पटविण्याच्या अनुषंगाने मृत तरुणाचा फोटो दाखवित ओळख पटविण्याच्या कामाला गती दिली असता एका तरुणाने हा तरुण माझ्यासोबत रिकाम्या बाटल्या जमा करत होतो, अशी माहिती दिली. तो भुसावळकडचा आहे, हेही त्याने सांगितले. त्यानुसार सहायक फौजदार शेलार यांनी भुसावळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या मित्रांना मृताचा फोटो व्हाट्सअॅपवर टाकला.

दरम्यान, हा फोटो भुसावळ येथील साई डेअरी चालकांनी ओळखला. व या तरुणाची आई व भाऊ भुसावळ येथे राहत असल्याचे सांगितले. या आधारे मृताचा भाऊ किशोर भागवत सोनवणे तसेच त्याची आई वत्सला भागवत यांना तरुणाचा फोटो दाखविला असता त्यांनी तो ओळखला व मृताची ओळख पटली.

दोघांना पोलिसांनी जळगाव रुग्णालयात बोलवून घेतले. अशा गतीमानतेच्या तपासाने अवघ्या तीन तासात अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार संजय शेलार करीत आहेत.