जळगावमधील थरारक घटना! सुसाट कारने डॉक्टरला उडविले, गुन्हा दाखल

जळगाव:  रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने उडविले. जागतिक आरोग्य संघटनेचे नाशिक विभागाचे क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षद भाऊराव लांडे यांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील महाबळ रोडवर हॉटेल रॉयल पॅलेस जवळ ही घटना बुधवार, ८ रोजी रात्री घडली. जागतिक आरोग्य संघटना या संघटनेचे नाशिक विभागाचे क्षयरोग अधिकारी म्हणून हर्षद लांडे कार्यरत होते. आरोग्य डब्ल्यूएचओची महत्वपूर्ण बैठक बुधवार, ८ रोजी जळगाव येथे आयोजित केली होती.

या बैठकीसाठी ते जळगाव येथे आले होते. बैठकीचे कामकाज आटोपल्यानंतर ते शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले. गुरुवार, ९ रोजी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डिन यांच्यासह शल्य चिकित्सक यांची भेट घेवून आरोग्यसंदर्भात चर्चा करणार होते. दरम्यान, महाबळ रोडवरील मुक्कामाला थांबलेल्या एका डॉक्टर सहकाऱ्याला भेटण्यासाठी डॉ. लांडे याठिकाणी आले. सहकाऱ्याची गाठभेट झाली. ते येथून रात्री बाहेर पडले. हॉटेल समोर ते रस्ता क्रॉस करत असताना काव्य रत्नावली चौकाकडून सुसाट कार आकाशवाणी चौकाकडे जात होती. या कारने डॉ. लांडे यांना धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दुर्घटना घडल्यानंतर अपघातग्रस्त कारवरील चालक त्याच वेगाने वाहन घेत मार्गस्थ झाला. ही घटना रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार लक्षात येताच रॉयल पॅलेस येथील कर्मचारी तसेच प्रत्यक्षदर्शीनी स्स्त्याकडे धाव घेतली. त्यानंतर घटनेची खबर पोलिसांना तात्काळ दिली. डॉ. हर्षद लांडे यांना त्वरीत खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर रात्री १२.४० वाजेच्या सुमारास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यांच्या पश्चात पत्नी, वडील, मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे.

ही खेदजनक घटना कळाल्यानंतर मुंबई, नाशिक, धुळे येथे आरोग्य क्षेत्रात शोककळा पसरली.मृतदेह हलविला मुंबईला शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी त्यांचे बंधू शत्रुघ्न माळी यांच्यासह नातेवाईकांकडे डॉ. हर्षद लांडे यांचा मृतदेह स्वाधीन करण्यात आला. एका रुग्णवाहिकेतून मृतदेह घेवून नातेवाईक मुंबईकडे रवाना झाले. रात्री नऊ वाजेनंतर मुंबई दादर येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अंत्ययात्रा निघणार असल्याचे सांगण्यात आले.