जळगाव : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे दोन महिलांसह एका वृद्धाचा जीव गेल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. अशातच गुजराल पेट्रोल पंपाच्या पुढे एका भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॉलाचे टायर फुटले. चालकाने नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात ट्रॉला दुभाजकावर आदळली. यामुळे मोठा अनर्थ टळला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धुळ्याकडून भुसावळकडे गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलावरून हा ट्रॉला जात असताना मानराज पार्कच्या अलीकडे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा प्रचंड गोंधळ उडाला. रस्त्यावरच्या वाहनावर ट्रॉला धडकू नये म्हणून चालकाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दुभाजकाच्या दिशेने नेला. त्यात लोखंडी व सिमेंटचे ब्लॉक पंधरा फुटापर्यंत घासले गेले. पाइप तर अक्षरशः उंच उडाले. हा अपघात पाहणाऱ्यांचा अक्षरशः थरकाप उडाला.
ट्रॉला पलटी होण्यासह समोरची वाहने उडविण्याचा होता धोका
विशेष म्हणजे, या मार्गावरून विद्यार्थ्यांची रेलचेल असते. स्कुल बस, ऑटो रिक्षा व पालकवर्ग या मार्गावरून मुलांना शाळेत घेऊन जात असतात. चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी हानी टळली, अथवा ट्रॉला पलटी होण्यासह समोरची वाहनेही उडविण्याचा धोका होता.