जळगाव: जळगावातील सराफा व्यावसायिकांची रक्कम कुरियर कंपनीच्या वाहनातून मुंबई येथे सोने खरेदीसाठी पाठवली जात असताना शहापूरनजीक इनोव्हा वाहनातून आलेल्या संशयितांनी तपासणीच्या नावाखाली दरोडा टाकत पाच कोटी ४० लाख रुपये लुटले होते. या दरोडाप्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली असल्याची माहिती शहापूर पोलीस निरीक्षक मारोती जगताप यांनी दिली. पोलीस असल्याचे भासवून टाकला दरोडा जळगावातील काही सुवर्ण व्यावसायिकांची रक्कम एकत्रित करून मुंबई येथे सोने खरेदीसाठी कुरियर कंपनीच्या माध्यमातून पाठवली जात होती.
नाशिक ते मुंबई दरम्यान शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आटगावनजीक एका ढाब्याजवळ हे वाहन येताच इनोव्हा कारमधून आलेल्या संशयितांनी पोलीस असल्याचे भासवत वाहनाची झडती घेतली व एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम नेणे गुन्हा असल्याचे सांगत रक्कम तुटून नेली. महामार्गावरील आटगावनजीक हा प्रकार घडला. याप्रकरणी जळगावच्या स्कायकिंग कंपनीचे तानाजीराव थोरात यांनी शहापूर पोलिसात फिर्याद नोंदवली. कैलास लोहार, सचिन सोडे व अन्य दोघे हे १५ मार्च रोजी मुंबईत जात असताना दरोड्याचा प्रकार घडला तर १७ मार्च रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक : मुद्देमालाची रिकव्हरी
जळगावातून एका कुरिअरच्या वाहनातून ही रक्कम नेण्यात येत होती. शहापूरनजीक एका ढाब्याजवळ पोलीस असल्याची बतावणी करून काही जणांनी वाहनाची तपासणी करीत नंतर दरोडा टाकून रक्कम लुटली. शहापूर पोलिसात गुन्हा दाखल होताच सीसीटीव्ही व वर्णनावरून १२ आरोपींना अटक करण्यात आली. मुद्देमालाची रिकव्हरी सुरू असत्याचे शहापूर पोलीस निरीक्षक मारोती जगताप यांनी सांगितले.