जळगाव : गझल मंथन साहित्य संस्था, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे रविवार, १० मार्च रोजी व. वा. जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात खान्देश विभागीय एक दिवसीय मराठी गझल संमेलनाचे आयोजन केले आहे. जळगाव येथील गझलकार डॉ. ज्ञानेश पाटील हे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत. ‘गझल’कार डॉ. शिवाजी काळे (राशीन, जि. अहमदनगर) हे उद्घाटक तर गझलकार नीलेश कवडे (अकोला) हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून गझलकार सतीश दराडे, संदीप वाकोडे, सच्चिदानंद जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. गझलकार डॉ. कैलास गायकवाड, विजय वडवेराव, रावसाहेब कुवर, विजय पाटील, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, वीरेंद्र बेडसे हे नामांकित गझलकार विविध सत्रात होणाऱ्या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. गझलकार राज शेळके, संदीप पटेल, डॉ. कुणाल पवार, छाया सोनवणे, आशा साळुंके, ज्योती वाघ हे मुशायऱ्याचे सूत्रसंचालन करतील.
संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील सुमारे ७० गझलकार सहभागी होतील. सहभागी गझलकारांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. जळगावचे कवी अॅड. मुकुंदराव भाऊराव जाधव यांचा ‘फुलला सुगंध प्रेमाचा..’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. प्रेम या एकाच विषयावर आधारित विविध ९५ कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात आहे. या संग्रहाला उर्मिला बांदिवडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
गझल रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, खान्देश विभाग अध्यक्ष काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष अॅड. मुकुंदराव जाधव, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.