जळगावात प्रथमच ॲनिमिया तपासणीसाठीचे अत्याधुनिक मशीन

येथील स्टेट बँकेतर्फे केशवस्मृती प्रतिष्ठान संचलीत प्लाझ्मा लॅबला ॲनिमिया तपासणीसाठीचे अत्याधुनिक मशीन भेट म्हणून देण्यात आले. स्टेट बँकतर्फे नियमितपणे विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, ग्रामीण आर्थिक विकास आदी क्षेत्रात उपक्रम राबवले जातात. आर्थिक व्यवहारासोबत समाजाप्रती आपले योगदान असावे, या कर्तव्यभावनेतून अधिकाधिक मदतकार्य देण्याचा प्रयत्न नियमितपणे करत असते. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात केशवस्मृती प्रतिष्ठान व प्लाझ्मा लॅब तर्फे ऍनिमिया आणि थॅलेसेमिया मुक्त समाज या प्रकल्पांतर्गत रक्तातील विविध चाचण्या केल्या जातात. आजवर करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये असे आढळून आले की ॲनिमियाचे प्रमाण सर्व साधारणपणे पन्नास टक्के इतके आहे.

रक्त कमी असण्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आयर्नची कमतरता, ब जीवनसत्वाचा अभाव तर काही जातींमध्ये थॅलेसिमिया व सिकलसेल ॲनिमियाचे रुग्ण आढळून येतात. ॲनिमियाचे निदान करण्याकरता विविध तपासण्या करणे खर्चिक असते. एसबीआय फाउंडेशन तर्फे ॲनिमिया व थँलेसमिया मुक्त समाज या प्रकल्पाच्या कामाची दखल घेत अतिशय आधुनिक असे कम्प्लीट ब्लड चेकअप 6  मशीन डोनेट करण्यात आले आहे.

जळगावमध्ये अशा प्रकारचे हे पहिलेच मशीन असून यात रक्ताची कमतरता कशामुळे आहे, हे देखील तपासता येणार आहे. त्यामुळे खेडोपाडी तपासण्या करून ॲनिमियाचे योग्य ते निदान व उपचार करण्यास मदत होणार आहे.यावेळी एसबीआयचे रिजनल मॅनेजर अमित कुमार, प्रख्यात सर्जन डॉ. सी जी चौधरी, रोटरी वेस्टच्या अध्यक्ष सरिता खाचणे, माधवराव गोळवलकर ब्लड बँकचे प्रमुख शरद  कोत्तावर, डॉ.भरत बोरोले, दिलीप नारखेडे, प्लाझ्मा लॅब संचालिका डॉ. सई नेमाडे उपस्थित होते.