जळगाव : मुसळी ते चिंचपूरा गावादरम्यान भरधाव कार पलटी होऊन झालेल्या अपघातात १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. गुरूवार, ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तर कारमधील किर्तनकार किरकोळ जखमी झाले. राज महेंद्र शिरसाट वय १८ रा. सार्वे ता. धरणगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील सार्वे गावात राज शिरसाट हा आपल्या आई आणि आजीआजोबांसोबत वास्तव्याला होता. आई मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर राज शिरसाट हा शिक्षण घेत होता. त्यांच गावात त्यांचे मामा देखील राहतात. गुरूवार, ४ एप्रिल रोजी दुपारी राज शिरसाट हा त्यांच्याच गावातील किर्तनकार सुरेश अशोक अहिरे सार्वेकर महाराज यांच्या कार क्रमांक (एमएच ०९ डीएक्स ८९९१ ) ने सार्वे गावातून जळगावला जाण्यासाठी निघाले.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास चिंचपूरा ते मुसळी फाट्याच्या दरम्यान भरधाव वेगाने जात असताना त्यांची कार अचानक झाडाजवळ फेकली गेली. या अपघातात राजचा जागीच मृत्यू झाला. तर सार्वेकर महाराज हे जखमी झाले.
रोडच्या बाजूला शाळेतील शिक्षक डी.के.पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने कारमधून राजला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होताच एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.