जळगावात वर्षभरात होणार पीएम ई बस स्थानक मनपाने काढली निविदा

जळगाव :   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या पीएम ई बस योजनेच्या अंतिम आराखड्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जळगाव महापालिकेने छत्रपती शिवाजी उद्यानाजवळील टी.बी. रूग्णालयाच्या जागेवर ई बससाठी डेपो व स्थानक तयार करण्यासाठी निविदा काढली आहे. केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गंत राज्यातील १९ शहरात १ हजार ४५३ वातानुकुलीत ई-बस योजना मंजूर केली होती. त्याबाबतचे आराखडे राज्य शासनास व तेथून केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व आराखड्यांना केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.

५० ई बसेस मिळणार जळगाव शहरासाठी ५० ई बसेस मिळणार असून यामध्ये तीन प्रकारच्या बसेसची मागणी जळगाव महापालिकेने केली होती. त्यानुसार मोठ्या, मध्यम व लहान अशा तीन प्रकारच्या बसेस मिळणार आहेत. मोठ्या बसेसला एका किलोमीटरसाठी २४ रुपये, मध्यमला २२ व लहान बसेसला २० रुपये खर्च केंद्र सरकार देणार आहे. मोठी बस १२ मीटर लांबीची तर लहान ७ मीटरची असणार आहे. या बसेस शहरासह परिसरातील २० किलोमिटर अंतरामधील गावांपर्यंत धावणार आहे. अशी धावेल ई बस महापालिकेने ई बससाठी १८ मार्ग निश्चित केले आहेत.

त्यात शहराच्या विविध भागांसह शहराला लागुन असलेल्या वावडदा, शिरसोली, नशिराबाद, आसोदा, विदगाव, तरसोद, पाळधी, विद्यापीठ, डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव खुर्द आदी मार्गांवर ई बस सेवा देणार आहे. असे आहे निविदेचे वेळापत्रक लोकसभा निवडणूकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने १५ रोजी तातडीने निविदा काढली. त्यात १५ ते २२ मार्चपर्यंत निविदा भरता येणार आहे. तर २६ मार्चला निविदा उघडण्यात येणार आहे. यात ई-बसेससाठी बसस्थानक, ईलेक्ट्रिीक जोडणीच्या काम करण्यात येणार आहे.

बसस्थानकाच्या कामासाठी ७ कोटी ३५ लाख तर ईलेक्ट्रिक जोडणीच्या ९ कोटी ७२ लाखांचे कामाचा सामावेश आहे. टी.बी. रुग्णालयाच्या जागेस पसंती बसस्थानक व चार्जिंग स्टेशनसाठी मेहरुण तलावाजवळील शिवाजी उद्यानातील टी.बी. रुग्णालयाची जागा निश्चित करण्यात आली होती. या जागेची पाहणी आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्याला अंतिम स्वरुप दिले होते. वर्षभरात तयार होणार स्थानक महापालिकेने काढलेल्या निविदेनुसार बसस्थानक तयार करण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे.