जळगाव : जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी वेळेवर येत नाही, आले तरी बरेच कर्मचारी टेबलावर उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर १८ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीअंकित यांनी थेट हजेरी पुस्तक विभागांकडून मागविल्यानंतर यात तब्बल ३० कर्मचारी ‘लेट लतिफ’ म्हणून आढळून आले आहे. संबधित कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.
जि.प. अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना कार्यालयीन कामाचा वेळ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ असा निर्धारीत करण्यात आलेला आहे. असे असतांना सुध्दा बरेच कर्मचारी कार्यालयात उशिराने येवून चहापाणी व कार्यालयीन कामासाठी इतर विभागामध्ये जाण्याचा बहाणा करून कार्यालयाबाहेर इतरत्र फिरतांना आढळून येत असल्याने सीईओंनी सकाळी १० वाजताच प्रत्येक विभागाकडून हजेरी पुस्तक मागवून तपासणी केली.
त्यात ३० कर्मचारी लेट आल्याचे आढळून आले असून विभाग प्रमुखांना आदेश करत संबधीतांना नोटीस बजावण्याच्या सूचना केल्या आहे. तसेच बायोमॅट्रीक प्रणालीमधील हजेरीची पडताळणी करून वेतन अदा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. तसेच कर्मचारी तीन दिवस लेट आला तर त्याची एक दिवस सुटी धरली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ई ऑफीसची अंमलबजावणी सुरू
जिल्हा परिषदेत फाईलींसाठी यापूर्वी ऑनलाईटम फाईल ट्रॅकींग सिस्टीम होती. आता प्रशासनाने ई ऑफीससाठी प्रयत्न सुरू केले असून त्याची सुरूवात करण्यात आली आहे. या प्रक्रीयेत सर्व फाईलीची ऑनलाईन स्थिती समजणार असून तालुकास्तरावर देखील याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.