जळगाव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, २९ गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा

जळगाव :  जिल्ह्यात तापमान वाढू लागताच पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात २१ गावांना २३ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मार्च महिन्यात चाळीसगाव, भडगाव, पारोळा तसेच अमळनेर तालुक्यातील २९ गावांमध्ये पिण्याच्या पणीटंचाई निर्माण झाली. या गावामध्ये ३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाने ४१ गावांतील ४६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

उन्हाळ्याची चाहुल लागताच जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २२ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच १९ गावांतील २२ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. अमळनेर तालुक्यात ५ गावांना ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा तर १३ गावांतील १४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा गावाला टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत असून तीन गावात विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. पारोळा तालुक्यात खेडीढाके या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.