जळगाव : डिजीटल करंन्सीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा (बोनस) मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर गुन्हेगारानी चाळीसगाव येथे तरुणाच्या खात्यातील सुमारे २ लाख ९६ हजार रुपये ऑनलाईन स्वीकारत फसवणूक केली. याप्रकरणी अनंदा, अलिसा व अमिन यांच्याविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला. संकेत जयराम बडगे (२५) हे खाजगी नोकरी करतात. ते मूळ संत कबीर वॉड, जुनी वस्ती नवीन बस स्टँडजवळ, तिरोडा, जि. गोंदीया येथील असून ते बजाजनगर नवीन मालेगाव रोड, चाळीसगाव येथे वास्तव्यास आहेत.
३ सप्टेंबर ते १६ डिसेंबर २०२३ या दरम्यान अनंदा, अलिसा तसेच अमिन यांनी संकेत बडगे यांच्याशी व्हॉटसअॅप, टेलिग्राम या सोशल मीडिया साइटवरुन वारंवार संपर्क साधला.डिजीटल करंन्सीमध्ये गुंतवणूक करुन अनेक जण मोठा नफा कमवित आहेत. तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक नफा (बोनस) देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर संकेत यांच्या खात्यातून एकूण २ लाख ९६ हजार रक्कम संशयितानी ऑनलाईन स्वीकारली. त्यानंतर या सायबर गुन्हेगारांनी संकेत यांना पैसेही दिले नाहीत. बोनसही दिला नाही.
जास्तीच्या नफाच्या मोहात तरुणाने मात्र तीन लाखाची रोकड गमावली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणाच्या तक्रारीवरुन सायबर पोलीस ठाण्यात शनिवार, १६ रोजी गुन्हा दाखल झाला. तपास पो. नि. किसनराव नजन पाटील करीत आहेत.