जळगाव : जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोह्त्सवात जळगावकरांना पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी लाभणार आहे. या मोह्त्सवाच्या नियोजनाची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच खान्देशमधील स्थानिक कलाकारांना या महोत्सवात व्यासपीठ मिळावे. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की फेब्रुवारी महिन्याच्या १५ ते १९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान नागरिकांना सोयीचे ठरतीलअशा मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील मंजूर कामे व प्रलंबित कामांचा आढावा ही पालकमंत्र्यांनी घेतला. आचारसंहितेपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने कामांना गती देण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या