जिल्ह्यातील पाच तालुक्यात तीव्र टंचाई तापमानाचा पारा वाढला; ६१ टँकरव्दारे ५५ गावांना पाणीपुरवठा

जळगाव :  जिल्ह्यात सध्या ६१ टैंकरव्दारे ५५ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक तीव्र दुष्काळी तालुका म्हणून चाळीसगाव घोषित करण्यात आला आहे. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ३७ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे.

एप्रिल महिन्यात उन्हाची दाहकता वाढल्याने तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान वाढल्याने उकाड्याचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तामपानाचा पारा वाढल्याने जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेल्या तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अजून वाढणार आहे. सध्या जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात २० टँकरने पाणी दिले जात आहे. त्याचप्रमाणे भडगाव – तालुक्यातून २ तर पारोळा व भुसावळ तालुक्यात प्रत्येकी एका टँकरव्दारे पाणीपुरवढा केला जातो.

जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी जिल्ह्यात टँकरव्दारेही पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी अक्कलपाडा धरणातून पांझरामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. शुक्रवारी आवर्तन सुटणार असून या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे.

गणेश भोगावडे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. जळगाव