जॉर्जियाच्या पहेलवानाने जिंकला कुस्तीचा आखाडा

जळगाव : श्रीराम रथोत्सवानिमित्ताने येथील शिवतीर्थ मैदानावर कुस्त्यांची भव्य दंगल रविवार, ६ रोजी उत्साहात पार पडली. यावर्षी प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती लक्षवेधी ठरली. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सुरूवातीला लहान कुस्तीपटूंसह मुलींच्या गटाने आखाडा गाजवला.

सायंकाळनंतर जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनच नव्हेतर परराज्यातून आलेल्या नामवंत कुस्तीपटू मल्लांनी जळगावचा आखाडा गाजवला. यात सर्वात शेवटी आंतरराज्य नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे पुणे येथील पहेलवान भारत मदने विरूद्ध जॉर्जिया येथील पहेलवान टॅडो या कुस्तीपटूसोबत रोमहर्षक सामना रंगला. यात जॉर्जियाच्या पहेलवानाने ही बाजी मारली. अवघ्या तीन मिनिटांच्या कुस्तीत जॉर्जियाच्या पहेलवानाने भारत मदने यास धोबीपछाड देत ही कुस्ती जिंकली.

श्रीराम मंदिर संस्थान व केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने रथोत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन रविवारी दुपारी तीन वाजता जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव, आमदार सुरेश भोळे, मिलिंद दीक्षित, केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, संचालक संजय नारखेडे, सतीश मदाने, ‘तरुण भारत’चे दिलीप चोपडा, विभाकर कुरंभट्टी, सुनील याज्ञिक, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते झाले.

प्रारंभी या दंगलीत लहान पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यात १५० पहेलवानांच्या ७३ कुस्त्या खेळविण्यात आल्या. या महोत्सवात मुलींची कुस्ती लक्ष्यवेधी ठरली. गेल्या तीन वर्षापासून या महोत्सवात मुलींचाही सहभाग असतो. यात प्रामुख्याने खंडवा (म. प्र.), एरंडोल, अकोला, चाळीसगाव, धरणगाव येथील पहेलवान मुली सहभागी झाल्या होत्या. या कुस्तीच्या दंगलीत महिला पहेलवानांनी आपल्या कुस्त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
जळगावात कुस्त्यांच्या दंगलीची परंपरा संत आप्पा महाराज यांच्या काळापासून होती. मात्र नंतर अनेक वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. ही परंपरा केशवस्मृती प्रतिष्ठानने राखत गेल्या सात वर्षांपासून कुस्त्यांची दंगल पुन्हा आजवर सुरूच ठेवली आहे.

या कुस्त्यांच्या दंगलीत जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातील विविध भागातून मल्ल सहभागी झाले होते. शुक्रवारी श्रीराम मंदिर संस्थानचा रथोत्सव झाला. या कुस्ती महोत्सवांचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती शहरात रंगणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सकुतेचे वातावरण दिसून आले. या दंगलीत भारत विरूद्ध जॉर्जिया अशी ही कुस्ती खेळवली गेली. पुणे येथील पहेलवान भारत मदने व जॉर्जिया देशातील पहेलवान टॅडो जॉर्जिया यांच्यातील ही कुस्ती लक्षवेधी ठरली.

या कुस्ती महोत्सवात राज्यातील पुणे, संभाजीनगर, खंडवा, धुळे, कोल्हापूर, भोपाळ, बारामती यासह जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, भुसावळ, एरंडोल, जामनेर, पारोळा यासह विविध भागातून मल्लांनी सहभाग घेतला होता. कुस्ती उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख दीपक जोशी यांनी दुपारी १२ वाजेपासूनच वयोगट व वजनी गटानुसार कुस्ती जोड लावण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार प्राथमिक स्तरावर लहान कुस्तीपटूंच्या, महिला कुस्तीपटूंसह सायंकाळनंतर मोठ्या गटातील व शेवटी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गट या क्रमानुसार कुस्त्यांचा सामना रंगला.