जळगाव: बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील डी मार्टमध्ये दोन ग्राहकांच्या कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून काही तरूणांनी गोंधळ घालून डीमार्टवर दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना शहरात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मोहाडीरोड वरील डी मार्ट येथे बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन कुटुंब खरेदीसाठी आले होते. दोन्ही कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला या वादातचे रूपांतर थोड्यावेळात भांडणात झाले त्यामुळे एका कुटुंबातीलकाही तरूणांनी डीमार्टमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली यावेळी वातावरण तापल्याने कोणताही अनुचित प्रकार होवून नये म्हणून डीमार्टच्या कर्माचार्यांकडून शटर बंद करण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरूणांना समजविण्याचा प्रयत्न करत असतांना एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील मारहाण केल्याने मोठा गोंधळ उडाला. पोलीसांनी याती काही तरूणांना ताब्यात घेतले आहे तसेच वाद झालेल्या दोन्ही कुटुंबियांना रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. डीमार्टमध्ये झालेल्या गोंधळामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर परिस्थीत आटोक्यात आल्यानंतर डी मार्ट मधील इतर ग्राहकांना एक-एक करून सोडण्यात आले.