भुसावळ ः क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवत भुसावळ रेल्वे विभागातील 29 वर्षीय तरुणाला ऑनलाईन तब्बल 65 हजार 509 रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार रविवार, 31 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शुक्रवार, 5 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भुसावळ शहर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लिंक पाठवत लांबवली रक्कम- सलमानखान कायमखान (29, गजानन महाराज नगर, भुसावळ) हे रेल्वे विभागात नोकरीला आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांना अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी सांगितले की, आम्ही क्रेडिट कार्डच्या बँकेतील कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह बोलत आहोत. तुमच्या क्रेडिट कार्ड जॉइनिंगचे चार्जेस 9 हजार 999 रुपये परत करण्याचे आहे, असे सांगून त्यांनी एक लिंक पाठवली. त्या लिंकचे स्टेप फॉलो करायला सांगितले. त्यानुसार सलमानखान यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून स्टेप फालो केले.
यावेळी अज्ञात मोबाईलधारकाने ऑनलाईन पद्धतीने दोन ट्रान्झेक्शन करून एकूण 65 हजार 509 रुपये किमतीची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेत चौकशी केली, परंतु त्याबाबत त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शुक्रवार, 5 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अज्ञात दोन मोबाईल धारकांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.