जळगाव: ११ एप्रिल बेलगंगा साखर कारखान्याचा विषय घेऊन उन्मेश पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या आशिर्वादाने एक वेळा आमदार तर एक वेळा खासदार झाले. मात्र जिल्हा बँकेच्या विषयासंदर्भात ते अज्ञानी आहेत. जिल्हा बँक हा राजकारणाचा अड्डा नाही. मैत्रीत करण पवार यांना फसविण्याऐवजी उन्मेश पाटील यांनी स्वतः उमेदवारी करावी, असे आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिले.
शुक्रवारी जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, करण पवारयांच्याबद्दल उन्मेश पाटील यांना एवढी मित्र म्हणून सहानुभूती होती तर त्यांनी करण पवार यांच्यासाठी भाजपकडून उमेदवारी का मागितली नाही, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.उन्मेश पाटलांना अनिष्ट तफावत म्हणजे काय? हे माहीत नाही? दरेगाव विकास सहकारी सोसायटी अनिष्ट तफावतीत आहे. या विकास सोसायटीत ते सभासद आहेत. त्या संस्थेचेही कामकाज सुरळीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्याअनुषंगाने उन्मेश पाटील यांनीविकास संस्थाच्या अनिष्ट तफावतीचा अभ्यास करावा. मात्र सध्या तेच अनिष्ट तफावत असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.
बेलगंगेच्या मुद्यावर आमदार झाले. मात्र त्यानंतर त्यांनी हा प्रश्न सोडून दिला. विकास सोसायट्यांच्या गटसचिवांचा प्रश्न त्यांनी कधीही शासन दरबारी मांडला नाही. त्यांनी १० वर्षे केले काय ? जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापनेपासून शेतकऱ्यांना विकास सोसायट्यामार्फत कर्जपुरवठा करीत आहे. जिल्हा बँकेच्या संदर्भात उन्मेश पाटील यांनी हवेत बोलण्याऐवजी अभ्यास करूनच बोलावे, असा टोलाही त्यांनी लावला.
उन्मेश पाटलांकडून जनतेची दिशाभूल
पाच वर्षे आमदार व पाच वर्षे खासदार राहिलेले उन्मेश पाटील अज्ञानी असून त्यांनी जिल्हा बँकेसंदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहिती जनतेसमोर मांडली आहे. त्यांचे अज्ञान यातून सिध्द होते. रिझर्व्ह बँक, नाबार्ड, राज्य शासन यांच्या नियमानुसार जिल्हा बँक चालते, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यावेळी म्हणाले