…तर थकबाकीदार घरकुलधारकांवरही होणार कारवाई; महापालिकेचे सुतोवाच

जळगाव:  घरकुलधारकांकडे सेवाशुल्कापोटी असलेल्या १८ कोटींच्या वसुलीसाठी आता महापालिकेच्या महसूल विभागाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सेवाशुल्कची थकबाकी न भरणाऱ्या घरकुलधारकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. आतापर्यंत विविध करांच्या वसुलीत महापालिकेने ११० कोटी रुपयांची वसुली केली आहे. शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेने शहराच्या विविध भागात घरकूल योजना राबवली होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने नगरपालिकेने त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे मालमत्ता व पाणीपट्टी न लावता सेवा शुल्क लावण्यात आले होते. कारवाई होणार पोलीस बंदोबस्तात थकबाकी न भरणाऱ्या घरकुलधारकांना संधी देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तर अमृतचे नळ संयोजन वाढीव दराने
थकबाकीदार घरकुलधारकांनी आता मागील वर्षाची व चालू वर्षाची थकबाकीची रक्कम भरली तर त्यांना अमृतचे नळसंयोजन त्वरित देण्यात येईल, अन्यथा त्यांना नवीन दरानुसार अमृतचे नळसंयोजन देण्यात येईल. मात्र त्यासाठी थकबाकी भरणे गरजेचे राहणार आहे.

असा आहे मास्टर प्लॅन
सध्या घरकूलांमध्ये मनपाच्या नोंदीनुसार मूळ घरकुलधारक राहत आहेत का, त्यांनी कधीपासून सेवाशुल्क भरले नाही याचा शोध घेतला जात आहे. जर मूळ घरकुलधारक नसेल तर जे राहत असतील त्यांच्याकडून सेवाशुल्काची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. जे घरकूलधारक सेवाशुल्कची मागील वर्षाची व चालू वर्षाची थकबाकी भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.