जळगाव : पोलीस ठाण्यात येत तरुणाने आरडाओरड सुरू केली. मला आत्याच्या मुलाने चॉपर मारला. त्याला आताच्या आता अटक करा, नाही तर मी येथे पोलीस ठाण्यात फॅनला लटकून आत्महत्या करतो, अशी सरळ धमकी ठाणे अंमलदार यांच्या समक्ष दिल्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. हजर महिला व पुरुष कर्मचारी चक्रावले. ही आश्चर्यकारक घटना सोमवार, १३ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्यात घडली.
रविवार, १२ पासून पोलीस निवडणूक ड्यूटीवर कार्यतत्पर होते. सोमवार, १३ रोजी मतदान असल्याने ते कर्तव्य बजावत होते. संध्याकाळी उशिरापर्यत मतदान प्रक्रिया चालली. त्यानंतर या मतदान पेट्या बसमधून बंदोबस्तात जमा करण्यात आल्या. त्यामुळे उशिरापर्यत प्रशासकीय यंत्रणा व्यस्त होती. दरम्यान रात्री २.०९ वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीस वर्षीय तरुण पोलीस ठाण्यात आला. आरडाओरड करत त्याने पोलीस ठाणेच डोक्यावर घेतले. मला आत्याच्या मुलाने चॉपर मारला आहे. त्याला आताचे आता अटक करा नाहीतर मी येथे पोलीस स्टेशनला फॅनला लटकून आत्महत्या करतो, असा दम भरत पोलिसांना घाबरविण्याचा ड्रामा केला.
इतक्यावर हा तरुण थांबला नाही. तो म्हणाला पेट्रोल घेऊन एस.पी. ऑफिस येथे जावून कोणाचा तरी मर्डर करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर हा तरुण आरटीपीसी रविंद्र तायडे यांच्या अंगावर धावून आला. अश्लील शब्दप्रयोग करीत त्याने पोलीस ठाण्यात बेशिस्त वर्तन करीत शासकीय कामात अडथळा आणला. प्रकार कळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून या तरुणाविरुध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.