जळगावातील ‘त्या’ घटनेला ‘लव्ह जिहाद’ची किनार

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२

जळगाव : दिल्लीतील श्रध्दा वालकरची लव्ह जिहाद प्रकरणातून झालेल्या हत्येने देश हादरला होता. अफताबने केलेल्या कृत्याचा देशभर निषेध झाला. मात्र सोमवारी जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरातही लव्ह जिहादची किनार असलेली घटना समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. 5 डिसेंबर रोजी रामानंद नगर पोलिसांनी शिवकॉलनी परिसरातील एका घरातून तरूण-तरुणीस दुपारच्या सुमारास ताब्यात घेतले. यात पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरूण दिल्ल्रीतील मुस्लीम समाजातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेला लव्ह जिहादसारखी पार्श्वभूमी असल्याची दिवसभर शहरात चर्चा होती. या घटनमुळे एकच खळबळ उडाली होती, तर काही संघटनांच्या कार्यकर्त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता.

कुटुंबियांकडून तक्रार नाही

शिवकॉलनी परिसरातून सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरूण दिल्ली येथील मुस्लीम समाजातील असल्याचे समजते. मात्र संबंधित तरूणींकडून किंवा तिच्या कुटुंबियांकडून यासंदर्भात तक्रार येत नाही, तोपर्यंत कुठलीही कारवाई करणे शक्य नसल्याची भूमिका पोलिसांकडून घेण्यात आली.

कमालीची गुप्तता

प्राप्त माहितीनुसार घटनास्थळी दोन तरूणी होत्या. रामानंद नगर पोलिसांनी या घटनेतील तरूण-तरूणीस ताब्यात घेतल्यानंतरही माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येऊन प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती. पोलीस प्रशासन काहीही बोलण्यात तयार नव्हते. त्यामुळे या प्रकाराचे गूढ दिवसभर वाढत गेले. रात्री उशिरापर्यंत या घटनेबाबत पोलिसांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केली नाही.

चौकशीच्या फेर्‍याने वाढला संशय

रामानंद नगर पोलिसांनी या घटनेप्रकरणी केलेल्या कार्यवाहीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. देशात सध्या लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच लिव्ह ऍण्ड रिलेशनसारख्या प्रकारांमध्ये अशा घटनांमध्ये भर पडत आहे. रामानंद नगर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. घटनेबाबत पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत माहिती देण्यास टाळाटाळ केली. दोन ते तीन तास विविध माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी ठिय्या मांडून होते मात्र कुणालाही पोलिसांनी दाद दिली नाही व माहिती देण्यात टाळाटाळ केली.

घटनेत लव्ह जिहादची पार्श्वभूमी नाही

या घटनेला लव्ह जिहादसारखी पार्श्वभूमी नाही. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकाराबाबत संपूर्ण शहानिशा झाल्यानंतर त्याबाबत स्पष्ट सांगता येईल व योग्य कारवाई होईल.

– रोहिदास गभाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रामानंद नगर पोलीस ठाणे, जळगाव