दुर्दैवी ! भरधाव डंपरने मुलाला चिरडले; जळगावातील घटना

जळगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय मुलगा जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार ८ रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान आसोदा रोडवर घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रोहण कैलास पाटील (१३, रा. चिंचोली, ता. जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील मजुरी करणारे कैलास पाटील यांचा मुलगा रोहण कैलास पाटील व त्याचा मावस भाऊ अक्षय संदीप इखे (२६, रा. चिंचोली, ता. जळगाव) हे दोघे जण शुक्रवारी दुपारी आसोदा येथे दुचाकीने (एमएच १९, डीएफ ६५०१) गुरांसाठी चारा पाहण्यासाठी गेले होते. तेथून दोघे जण परतत असताना लेंडी नाला पुलाच्या अगोदरच समोरुन येणाऱ्या डंपरची (एमएच १५, एके ३७२३) दुचाकीला धडक बसली.

 

दरम्यान, अक्षय इखे हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला तर रोहण हा मागच्या चाकाखाली आला. त्यामुळे तो जागीच ठार झाला. अपघातानंतर  चालक डंपर जागेवर सोडून पसार झाला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे. कष्टकरी पाटील दाम्पत्याला एक मुलगी असून रोहण हा एकुलता एक मुलगा होता.