जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन अडिच महिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. आतापर्यंत मान्सूनच्या १२० दिवसांपैकी ९०/९५ दिवसात सरासरीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के पाऊस झाला असून आठ दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेत जवळजवळ जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे एकीकडे ऑक्टोबर हिटची दाहकतायुक्त ३२ ते ३४ अंशादरम्यान तापमान आणि हवेतील आर्द्रतेमुळे आणि ठिकठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तर दुसरीकडे मान्सूनमुळे प्रवाहीत झालेल्या नदी नाल्यांचे दूषित पाणी स्थानिक पाणीपुरवठा योजनांव्दारे तुरटी वा अन्य घटकांव्दारे यंत्रजलशुद्धीकरण न होता थेट संमिश्र पाणीपुरवठा होत आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून फिनाईन, डास निर्मूलनासाठी फॉगींग मशीनव्दारे धूर फवारणी होत नसल्याने त्यामुळे डेंग्यू, टायफॉईड तसेच सर्दी, पडसे, खोकला सारखे व्हायरल इन्फेक्शन आजार बळावले असून या आजारांचे निदान वेळेवर होत नसल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यासह शहरात मोकळे भूखंड, पडक्या इमारती, घरे आदी ठिकाणच्या परिसरात दुरूस्ती देखभाली अभावी झाडाझुडूपांचे साम्राज्य पसरले असून त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत आहे. या ठिकाणी स्थानिक महानगरपालिका, नगरपरिषद, वा ग्राम पंचायत प्रशासनाने धूर फवारणी करावी. उघड्या नाले गटारांच्या परिसरात फिनाईलयुक्त डास किटकनाशक द्रवाची फवारणी करावी, जेणेकरून डासांची उत्पत्तीस अटकाव होवू शकेल.
स्थानिक स्तरावर मोठ्या ग्रामपंचायती गावांमध्ये कचरा संकलनासाठी घंटा गाड्या आहेत. तेथे वेळोवेळी कचरा संकलन तसेच उघड्या गटारांवर फिनाईन फवारणी, शक्य असेल तेथे फॉगींग मशीन व्दारे धुरळणी करण्यासह परिसर स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा विहिरीजवळ दूषित पाण्याचा उद्भव होणार नाही यासाठी विहिरीजवळील गवत काढण्यासह डबके बुजविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
– अनिकेत पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद जळगाव
वातावरणातील बदलामुळे शासकीय, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली आहे. जेष्ठ नागरीकच नाहीत तर सोबत लहान मुलांचीही संख्या जास्त आहे. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना सकस आहार द्यावा. डासांपासून बचाव करण्यासाठी घरे आणि आजूबाजूचे ठिकाणाचे साचलेले पाणी डबके बुजवावेत. डासांची उत्पत्तीची स्थाने नष्ट करावीत. डास प्रतिबंधक, जाळी आणि स्क्रीन केलेल्या खिडक्या, दारांचा वापर करा. संरक्षणात्मक कपडे घालावेत, विशेषतः डासांच्या वेळेत (पहाटे/संध्याकाळ) कीटकनाशक उपचार केलेल्या मच्छरदाण्या लावाव्यात. आजारपणात घरगुती उपचार न करता वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय जळगाव