दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तब्बल ‘इतके’ वर्ष करावासाची शिक्षा

Crime News: जळगाव शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दोन अल्पवयीन चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राज संतोष कोळी या आरोपीला याला न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एन.राजूरकर यांनी बुधवारी हा निकाल दिला. या घटनेतील दोन्ही पीडित बहिणींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची खडान‌्खडा माहिती न्यायाधीशांना दिली.

मिळलेल्या माहितीनुसार, राज कोळी याने २० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता अनुक्रमे ६ व ७ वर्ष वय असलेल्या दोन्ही चुलत बहिणींना आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने दोघींशी लैंगिक अत्याचार केला. दोन्ही बहिणींना झालेला प्रकार आईला सांगितला असता घटनेला वाचा फुटली होती.

आईने दोन्ही मुलींना सोबत घेत थेट नशिराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार कोळी याच्याविरुध्द कलम ३७६ ए-बी तसेच पोक्सो कलम ४, ६, ८ व १० नुसार गुन्हा दाखल झाला होता.सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एन.राजूरकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला.

यात दोन्ही पीडितांनी न्यायालयात घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली, त्यामुळे दोघांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. विशेष सरकारी वकिल तथा अतिरिक्त शासकीय अभियोक्ता चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन सरकारपक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.